सरकारचे शाळांना आदेश; निपाणी विभागात २६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना मिळतो लाभ
निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळांनी दैनंदिन लाभार्थी व उपस्थितीची माहिती ‘सरल’ प्रणालीवर दररोज दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाइन भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अनेक शाळांकडून ही माहिती वेळेत भरली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता वेळेवर नोंद न करणाऱ्या शाळांवर कारवाई होण्याची भीती आहे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, गळती थांबविणे यासाठी २२ ऑगस्ट १९९५ पासून केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. ही योजना लाभार्थी-विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी, यासाठी शासन वेळोवेळी यात सुधारणा करीत आहे. बऱ्याचदा शाळास्तरावर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वितरित करूनही त्याची नोंद ‘सरल’वर न झाल्याने शासनाच्या अहवालात विद्यार्थी आहारापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा थेट परिणाम योजनेच्या निधी, नियोजन व गुणवत्ता तपासणीवर होत आहे. शासकीय व अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक आहार देऊन त्यांचे आरोग्य, उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.लाभार्थीचा उपस्थिती आणि त्यांना मिळालेल्या लाभार्थींची पडताळणी एसएमएसद्वारे केला जात आहे.
——————————————————————-
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील २६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे. सर्व पात्र शाळांनी दैनंदिन उपस्थितींची माहिती नियमितपणे भरणे आवश्यक आहे. माहिती वेळेत न भरल्यास लाभार्थींना मिळणारा इंधन, भाजीपाला, इतर भत्ते मिळण्यास अडचण निर्माण होते. निपाणी विभागात आजपर्यंत पोषणची माहिती वेळेवर नोंदविण्याचे काम समाधानकारक आहे.’
-महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta