निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भक्तीभावाने आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवाउद्योजक अभिनंदन पाटील व सहकार रत्न उत्तम पाटील यांनी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी सिद्धेश्वर चरणी नतमस्तक होऊन बोरगाव शहराची सुख, समृद्धी आणि शांतीसाठी विशेष प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करण्यात आली.
यात्रेच्या वेळी मिरवणूक आणि भक्ती परंपरेचा संगम दिसून आला. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली भव्य मिरवणूक अत्यंत देखण्या स्वरूपात काढण्यात आली. बोरगाव, वडगोल आणि अब्दुललाट मानाच्या पालख्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.
सिद्धेश्र्वर यात्रेत याल्लमा देवीचा जग सहभागी झाला होता. भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यात्रेनिमित्त ग्रामदैवत बाबा ढंगवाली दर्गास गलेप अर्पण करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पुष्पवृष्टी करून पालख्यांचे स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ च्या जयघोषात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक प्रशासन आणि यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडली.
Belgaum Varta Belgaum Varta