
निपाणी (वार्ता) : चिंचली येथील मायाका देवीची यात्रेला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता.५) यात्रेच्या मुख्य दिवस असल्याने निपाणी परिसरासह सीमा भागातील महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मायाक्का चिंचली यात्रेला हजेरी लावून दर्शन घेण्यासह नतमस्तक झाले. बुधवारी रात्रीपासूनच खाजगी वाहनाने भाविक चिंचलीकडे रवाना होत होते. त्यामुळे निपाणी भागातील रस्ते यात्रेकरूमुळे गजबजून गेले होते.
तालुक्यातील ग्रामस्थांसह सीमा भागातील भाविक श्रद्धेने मायक्का चिंचली येथील प्रसिद्ध यात्रेसाठी जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या भागातील हजारो भाविक पायी, खासगी वाहने, बसने आणि सजवलेल्या बैलगाडीतून मायक्का चिंचलीकडे रवाना झाले होते. मायक्काच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील चिक्कोडी रोडसह प्रमुख रस्त्यांवर विविध वस्तू व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती.

गुरुवारी पहाटेपासूनच भाविक ‘मायाक्का’ च्या नावाने चांगभलं’ च्या गजरात चिंचलीकडे उत्साहात जात होते. काही भाविकांनी नवस फेडण्यासाठी पायी जाण्याचा संकल्प केला होता.यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी निपाणी आगारातून अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याशिवाय खासगी वाहनधारकांकडूनही प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रवासा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निपाणी पोलिस प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण, बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील महत्त्वाच्या चौकात पोलिस कर्मचारीतैनात करण्यात आले असून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.
—————————————————————-
आठवडाभर चालणार यात्रा
गुरुवारी(ता.५) यात्रेचा मुख्य दिवस होता. तरीही अनेक भाविक दोन दिवसापूर्वीच चिंचली येथे दाखल झाले होता. याशिवाय यात्रा झाल्यानंतरही अनेक भाविक जाऊन देवीचे दर्शन घेतात. त्यामुळे आठवडाभर निपाणी शहरासह अनेक गावांमधील इतर भाविकांची गर्दी असणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta