

शतकोत्तर परंपरा लाभलेल्या निपाणी शहराचे दैवत महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथील रथोत्सव महाशिवरात्रीचे खास आकर्षण आहे. यंदा बुधवारी (ता.१८) महादेवाचा ऐतिहासिक रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त…
गजेंद्र तारळे, महादेवाचे भक्त,
निपाणी
निपाणी नगरीची स्थापना श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर सरकार यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीतच महादेव मंदिराची स्थापना झाली आहे. त्यानंतर या मंदिरात महाशिवरात्रानिमित्त रथोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. सर्वधर्मिय बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने हा रथोत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे.
पूर्वी महादेव मंदिरात माघ व दशमीपासून आमावस्येपर्यंत रथोत्सव कार्यक्रमानिमित्त कीर्तन, देवदासींचे गायन व नृत्यसेवा’ केली जात होती. आता महादेव देवस्थान ट्रस्ट मंडळ आणि गणेश उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. महादेवाच्या मूर्तीची पालखी सूर्य, चंद्र, हत्ती, मोर, शेषनाग, सिंह, महाशिवरात्रीदिवशी नंदी आणि शेवटच्या दिवशी घोडा अशा प्रतिकात्मक वाहनावर आरूढ़ रूपातील सवाद्य मिरवणूक मशालीच्या उजेडात काढली जाते.

रथोत्सव कार्यक्रम तिथीप्रमाणे पाच-सहा दिवस चालू असतो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी रथोत्सवास प्रारंभ होतो. या रथोत्सवाची यथासांग पूजा निपाणकर सरकार यांचे वारस श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्याकडून झाल्यावर विविध सवाल जाहीर केले जातात. त्यानंतर महादेव मंदिरापासून महादेव गल्ली, गांधी चौक, गुरूवार पेठ मार्गे कोठीवाले कॉर्नर, दलालपेठेतून खोत गल्लीमार्गे परत महादेव मंदिर अशी भव्य मिरवणूक काढून मंदिरास प्रदक्षिणा घातली जाते.
संपूर्ण लाकडी असलेल्या रथाची कळसापर्यंतची उंची ३५ फुट इतकी आहे. रथाला चार लाकडी चाके असून ती मानाप्रमाणे लोहार व सुतार समाजातर्फे पारेच्या साहाय्याने ढकलली जातात. सजविलेल्या रथामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करणे, डाव्या व उजव्या बाजूस नारळ फोडण्यास बसणे, डावी व उजवी चौरी पूजा करणे तसेच हार घालण्याचा मान असे सवाल बोलले जातात.
दुपारी निघणाऱ्या रथोत्सव मिरवणुकीच्या अग्रभागी बॅन्ड, ढोल, ताशे, हती, घोडे, बैलगाड्या व शेकडो भाविक असतात. दोरखंडाच्या साहाय्याने ‘हर हर महादेव’च्या गजरात रथ ओढला जातो. सर्वधर्मिय बांधव रथाला नारळाचे नवसाचे तोरण बांधतात व श्रद्धेने नारळ वाढवितात.

महादेव मंदिर विश्वस्त मंडळातर्फे गेल्या ३४ वर्षात मंदिराच्या जिर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामध्ये मंदिरात संगमरवरी फरशी, शिखर व रंगकाम झाले आहे. ५ वर्षापूर्वी मंदिराशेजारी ४ हजार चौरस फुटाचे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे.सदरचे सांस्कृतिक भवन गरीब व श्रीमंतांना परवडेल अशा अल्पदरात ल व इतर कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत. आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी भरीव देणगी दिली आहे. मंदिरात महादेव यात्रा, कार्तिक दीपोत्सव, बसवेश्वर जयंती, रूद्राभिषेक, श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम, पगडीपदं स्पर्धा घेतल्या जातात. श्रीगणेश मंडळातर्फे ३९ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. याकाळात अकरा दिवस विविध कार्यक्रमांचेआयोजन केले जाते. गणेशाला दहा किलो चांदीची आभुषणे घालण्यात आली आहेत. महादेव यात्रा व गणेशोत्सव काळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. समाजातील महिलांनी निलांबिका महिला बळगची स्थापना केली असून त्यात ५०० महिलांचा सहभाग आहे. त्यांच्यामार्फत अनेक कार्यक्रम घेतले जातात.
मंडळाचे विश्वसस्त माजी सभापती सुनील पाटील, अमर बागेवाडी,संजय मोळवाडे, रवींद्र कोठीवाले, सदाशिव चंद्रकुडे, मनोहर मोळवाडे, शिवकांत चंद्रकुडे, मल्लिकार्जुन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. यंदाचा रथोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यरत झाले आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य रथोत्सवाबरोबर गणेश चतुर्थीही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दरवर्षी आकर्षक व मोठी मूर्ती बसविण्यात येते. महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात कायमस्वरूपी मोठ्या आकाराची चांदीची गणेशमूर्ती बसविण्यात आली आहे. त्याला लागूनच उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.उत्सव काळात मनोभावे पूजा करून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. अनंतचतुर्दशीदिवशी मोठी मिरवणूक काढली जाते. आजतागायत निपाणी शहरात मोठी मिरवणूक काढण्याचा मान महादेव मंदिर सांस्कृतिक भवनाने मिळविला आहे. सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच या मंडळाचे कार्यकर्ते दही-हंडी फोडण्यात तरबेज झाले आहेत. शहरातील बहुतांश ठिकाणच्या दही-हंडी फोडण्याचा मान या मंडळाने पटकावला आहे. त्यांना सुनील पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
धार्मिक कार्याबरोबरच महादेव देवस्थान मंडळ व श्रीगणेश मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. महादेवाच्या रथोत्सवास निपाणीसह परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते. शहरासह परिसरात रथोत्सवाला वेगळे स्थान प्राप्त झाले असून त्यात सर्व जाती, धर्माच्या भाविकांचा सहभाग असतो. त्यामुळे येथील रथोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta