
ताडपत्रीचा आधार घेत शेतकऱ्यांची धडपड; गहू, ज्वारी, हरभरा काढणीला वेग

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरातील शिवारात सोन्यासारखं पीक डोलतंय, विहिरीला पाणी असून कष्टाचे फळ पदरात पडण्याची वेळ आली आहे. पण अचानक आभाळ भरून येत असल्याने बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकत आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आकाशात ढगांची दाटी आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेईल की काय, या धास्तीने शेतकरी चा चिंताग्रस्त झाला आहे. उभ्या पिकांची काढणी करून सुरक्षित रास घरापर्यंत पोहचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
यावर्षी वरुणराजाच्या कृपेने पाणीसाठा मुबलक असल्याने परिसरात रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गहू, ज्वारी आणि हरभऱ्याची पिके बहरली आहेत. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. शेतात कापून ठेवलेला हरभरा, पक्व झालेला गहू आणि ज्वारी वाचवण्यासाठी शेतकरी ताडपत्र्यांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी कायम दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
——————————————————————-
आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार
पावसाच्या भीतीने पारंपरिक पद्धती बाजूला सारून शेतकरी आता आधुनिक हार्वेस्टरच्या मदतीने गहू, हरभरा काढणीला पसंती देत आहेत. कमी वेळात काम उरकत असल्याने काढणी यंत्रांचा धडधडाट शिवारात वाढला आहे. मळणी करून धान्य लवकर सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मोठा पाऊस झाल्यास ज्वारी काळवंडण्याची शक्यता आहे.
——————————————————————–
‘यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असताना दोन दिवसांपासून अवकाळीचे संकट उंबरठवावर आले आहे. अवकाळी पाऊस झाला, तर ख्बी पिकांचे नुकसान होणार आहे.’
-वीरूपाक्ष हरेर, शेतकरी बेनाडी.
Belgaum Varta Belgaum Varta