
निपाणी (वार्ता) : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून स्वच्छतागृह वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. त्याची चौकशी करून प्रवाशांना मोफत सुविधा देण्याची मागणीही येथील मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय गॅरंटी योजना कमिटी पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखासह स्वच्छता कंत्राटदारांना भेट देऊन आठवड्याभरात ही रक्कम घेण्याचे बंद करण्याची सूचना केली आहे.
येथील बस स्थानकात कर्नाटकसह महाराष्ट्रातील प्रवाशांची दिवसभर गर्दी असते. स्थानक परिसरात महिला आणि पुरुषांसाठी मोफत स्वच्छतागृहचा वापर असल्याचा फलक लावण्यात आला. तरीही महिला आणि पुरुष प्रवाशांकडून दहा रुपये सक्तीने आकारले जात आहेत. बस स्थानकाच्या भिंतीवर पुरुष आणि महिलांसाठी मोफत मुतारी वापर असा स्पष्ट उल्लेख असताना प्रत्यक्षात मात्र महिला प्रवासांकडून ५ रुपये आकारले जात आहेत. तर पुरुषांना शौचालयासाठी २ रुपये असताना दहा रुपयाची आकारणी सुरू आहे. पुरुषांना मुतारीची मोफत सुविधा दिली जात असताना महिलांकडून पैसे आकारले जात असल्याने महिला प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून देखील रक्कम वसुलीचा प्रकार सुरू असल्याचे प्रवासी आणि मानव अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अन्यायकारकरीत्या पैसे आकारले जाणे हे नियमबाह्य असून प्रशासनाच्या नियमानुसार प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची मागणी मानव अधिकार संघटनेचे अशोक खांडेकर, सचिन पवार यांच्यासह प्रवाशांनी केली आहे.
——————————————————————–
केवळ आठ स्वच्छतागृहे
दररोज कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो प्रवासी निपाणी आगारातून ये-जा करतात. त्यांच्यासाठी केवळ आठ स्वच्छतागृहे आहेत. शिवाय बराच वेळा ती अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta