
अकोळ विविधोद्देश ग्रामीण कृषी संघाच्या इमारतीचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आणि रक्षण करणाऱ्या सैनिकांचे प्रत्येकानी आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. बाहेरचे लोक निपाणीत नको, त्यासाठी स्थानिक उमेदवारांची गरज आहे. शेतकऱ्यांना डिवचणाऱ्याना निवडणुकीत एका मताला एक लाख रुपये दिले तरी मत मिळणार नाही. योग्य व्यक्तीलाच मतदान मिळेल. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीच जन्म घेतला असून मरण पत्करण्यासही तयार असल्याचे माजी खासदार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश कत्ती यांनी सांगितले.
अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची नवीन इमारतीचे उद्घाटन आणि संघाच्या शताब्दीपुर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत संघाचे मार्गदर्शक बाबा पाटील यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.
माजी खासदार कत्ती म्हणाले, पीकेपीएस व सहकारी संस्था राजकारणाचे केंद्र बनत आहेत. त्यामुळे अशा संस्था संपुष्टात येण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कुणाचेही कर्ज बुडवलेले नसताना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. राजकारण करताना शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये. शिवाय घरात बसणाऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्या बद्दल बोलू नये, असेही कत्ती यांनी स्पष्ट केले.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, पीकेपीएसना ऊर्जा देण्याचे काम माजी खासदार रमेश कत्ती यांनी केले आहे. शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्यासाठी सहकार संस्था टिकल्या पाहिजेत. राजकारण विरहित संस्था चालविल्यास निश्चितच शेतकरी व संस्थेला लाभ होऊ शकतो. पी के पी एस आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी व सहकारी संस्थांसाठी येणाऱ्या योजनांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. संस्थानी शेतकऱ्यांनी सभासदांच्या हिताचे धोरण ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. ॲड. संजय शिंत्रे, प्रा. सुभा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊनजेष्ठ मार्गदर्शक बाबा पाटील यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत साळांकुरे, उपाध्यक्षा शारदा कोळी, गाव कामगार पाटील राजू पाटील, बसवराज पाटील, अरुण निखाडे धीरज पाटील, निरंजन पाटील, संघाचे अध्यक्ष पद्मराज पाटील, उपाध्यक्ष निर्मला भुई, संचालक युवराज पाटील, विवेकानंद सोळांकुरे, शर्मिला कागे, विमलनाथ पाटील, रावसाहेब मुधाळे, महेश मलाबदे, श्रीकांत बन्ने, चेतन स्वामी, सुंदर पाटील, विजय सदलगे, रमेश भिवसे, अनिल कोळी, भूपाल म्हेत्री, प्रदीप उपाध्ये यांच्यासह संचालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta