निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सर्कलचा रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ ही मान्यवरांच्या हस्ते झाला. पण परिसरातील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरू झालेले रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन अतिक्रमण काढण्यासह संधी करण्याच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.
अनेक वर्षे बोरगाव सर्कलचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याची शहरवासीयांची मागणी होती. या मागणीची दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला असता या सर्कल कामासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून शहराच्या प्रमुख केंद्र असणाऱ्या सर्कल रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण कामास २ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तरीही अनेक दिवसांपासून सदरचे काम बंद पडल्याचे दिसत आहे. बस स्थानक परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी सर्कलचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. अद्यापही काही अंशी अतिक्रमण काढण्यास कांही नागरिकांची तक्रार असल्याने सदरचे कामकाज बंद आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबवून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सदरच्या विकास कामाला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे.
——————————————————————–
‘सर्कल मधून ये -जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ ववाढली आहे. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत.परिसर व रस्त्याच्या कडेला व्यवसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सहकार्य केल्यास सर्कल रुंदीकरणास चालना मिळणार आहे.’
-तुषार कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बोरगाव
——————————————————————-
‘सर्कल रुंदीकरणाची नोटीस मिळताच बहुतांशी व्यवसायिकांनी स्वतःहून आपले व्यावसायिक खोकी काढून घेऊन नियमाचे पालन केले आहे. पण अजून काही अंशी व्यावसायिकांनी रस्त्यावरच आपली खोकी ठेवली आहेत. त्यामुळे दबावाखातर अधिकाऱ्यांनी दुजाभाव न करता तातडीने सदरचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी’.
-बी. के महाजन, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, बोरगाव
Belgaum Varta Belgaum Varta