
रयत संघटनेतर्फे निवेदन
निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा चिक्कोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे.
चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयापुढे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर खासदार मंगल अंगडी यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी राजू पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.
सुपिक जमिनीच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन करत पर्यायीमार्गे रेल्वे मार्ग निर्माण करण्याची मागणी केली. यावेळी रयत संघटना व शेतकऱ्यांनी यासंदर्भात खासदार अंगडी यांना निवेदनही दिले.
राजू पोवार म्हणाले, जुना प्रस्तावित रेल्वे मार्ग बदलून नवीन मार्ग काढण्याचा घाट सरकारने घातला आहे.या नवीन मार्गावर असलेल्या शेतकरी बंधूच्या सुपिक जमिनी जाणार आहेत. तुटपुंच्या जमिनीवर अगोदरच कसातरी उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. आठ दिवसांच्या मुदतीत योग्य निर्णय झाला नाही तर मंगला अंगडी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, कार्यदशी प्रकाश नाईक, गौरव समिती अध्यक्ष शशिकांत पडसलगी, प्रसाद पाटील, निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, बाळू पाटील, एल. बी. खोत(बोळेवाडी) यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta