निपाणी : कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत हुपरी रोड मार्गावर कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या गतिरोधकावरून दुचाकी आदळल्याने महिला ठार झाली. वासंती राजेंद्र पाटील (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र ईश्वर पाटील हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.१४) दुपारी झाला. अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत झाली आहे. नातेवाईकाचे लग्नकार्य आटोपून परतत असताना हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटील दाम्पत्य हे दुचाकीवरून कुर्ली येथून शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याला गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते पुन्हा कुर्ली गावाकडे येत होते. त्यांची दुचाकी या मार्गावरील ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या वासंती जोराने खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. हुपरी येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर कुर्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta