
हॉटेल, धाब्यांची कसून चौकशी : कारवाईत राहणार सातत्य
निपाणी (वार्ता) : घरगुती वापरासाठीच्या गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी घाबरलेले ग्राहक घरचा गॅस संपण्यापूर्वीच तो आणण्यासाठी एजन्सीच्या कार्यालयांत गर्दी करू लागले आहेत. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित होत असून त्याची झळ निपाणी तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि धाब्यांची आहार व अन्न निरीक्षकाकडून चौकशी करण्यात येत आहे. घरगुती वापराचा सिलेंडर पुरवठा सुरळीत आहे. तर शहरात कमर्शियल गॅस सिलिंडर २५ दिवसांनी मिळत असल्याने तुटवडा निर्माण झाला.त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि छोटे खानावळ चालक संकटात सापडले आहेत. निपाणी शहर हे शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आहेत. कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने अनेकांना ‘ब्लॅक’ने गॅस खरेदी करावा लागत आहे. किंवा चढ्या दराने सिलिंडर घ्यावा लागत आहे. गॅसअभावी अनेक हॉटेल्स दुपारी किंवा रात्री लवकर बंद करावी लागत आहेत.
हॉटेल्सच नव्हे, तर गॅसवर चालणारे छोटे उद्योग, लोखंडी काम करणारे कारागीर आणि मिठाई विक्रेते यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. गॅसशिवाय व्यवसाय कसा करायचा, असा संतप्त सवाल हॉटेल चालकांनी उपस्थित केला आहे.
——————————————————————-
‘व्यावसायिक गॅस संपत आला आहे. आता नवीन गॅस मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे गॅस पुरवठा पूर्ववत न झाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येते की काय, अशी भीती आहे.’
–संदीप खडके, हॉटेल व्यावसायिक, निपाणी
——————————————————————–
‘सिलेंडरचा काळाबाजार आणि घरगुती सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पथकाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.१६) पासून कारवाईला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर धाब्यांची चौकशी केली जात आहे. दिवसभरात ६ हॉटेल व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे.
-अभिजीत गायकवाड, अन्न व आहार निरीक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta