कुर्ली हायस्कूमध्ये पालक प्रबोधन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून पोकळ जाहिराती करुन पालकांची दिशाभूल केली जात आहे. पण रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तेला प्राधान्य देत ग्रामीण भागात उत्तम शिक्षणाची कवाडे खुली केली असल्याचे मत माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात पालक प्रबोधन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. ए. पाटील यांनी शाळेतील विविध उपक्रमांची प्रोजेक्टरवर माहिती दिली. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी विद्यालयाची गुणवत्ता, विज्ञान प्रदर्शन, क्रीडास्पर्धा व इन्स्पायर अवार्ड शिष्यवृत्ती यामध्ये मिळालेल्या यशाचा आढावा घेतला. पालक संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी विद्यालयातील यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती दिली. यावेळी पालकांना अटल लॅब, संगणक कक्ष व इन्ट्रॅक्टिव्ह पॅनलवर अध्यापन पद्धतीची प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली.
याप्रसंगी पालक संघाचे राजाराम पाटील, तानाजी शेटके, नामदेव पाटील, एस. डी. वडराळे, यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. के. ए. नाईक यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta