Sunday , April 5 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अन्न व्यवस्था धोक्यात

Spread the love

 

रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार; निपाणीतील बैठकीत सरकारला इशारा

निपाणी (वार्ता) : गॅस व इंधनाची टंचाई भासल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पण भविष्यात अन्नदाता शेतकरीच संपावर गेला तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सर्वत्र आहाकार माजेल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. निपाणी येथे आयोजित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते
राजू पोवार म्हणाले, सर्वत्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. जगाच्या एका कोपऱ्यात असलेल्या इराण-इराक सारख्या देशांनी जर कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला, तर आपल्या देशाची गती थांबून अर्थव्यवस्था डळमळीत होण्यासह सामान्यांचे जगणे कठीण होत आहे.
दुसऱ्या देशांनी इंधन रोखल्याने देश हतबल बनत असल्यास याच देशाचा कणा असलेला शेतकरी वर्षानुवर्षे न्याय्य हक्कासाठी लढत आहे. तरीही सरकारला न्याय देता आलेला नाही.
शेतकऱ्यांनी पिके न घेण्याचे ठरविल्यास किंवा पिकवलेले धान्य बाजारपेठेत न पाठविल्यास संपूर्ण यंत्रणात बंद पडल्याशिवाय राहणार नाही.
यंत्रांना चालण्यासाठी तेलाची गरज आहे तसे समाजाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. पेट्रोलच्या दरात थोडी वाढ झाली तरी चर्चा होते पण शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळत नाही तेव्हा मात्र सरकार आणि समाज दोघेही मौन का बाळगतात असा प्रश्नही पोवार यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी नाही, तर आपल्या कष्टाच्या योग्य मोबदल्यासाठी लढत आहे. जर शेतकऱ्याने नांगर बाजूला ठेवला, तर सोन्या-चांदीने कोणाचेही पोट भरणार नाही. इंधन टंचाईवर उपाय शोधणाऱ्या सरकारने ‘अन्न टंचाई’ निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्याचा संयम ही त्याची कमजोरी समजू नका. तो ज्या दिवशी आपला हक्क मिळवण्यासाठी शेती थांबवेल, त्या दिवशी जगाला कळेल की खरा ‘पॉवर’ कोणाकडे आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

Spread the love  निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *