निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाल्मिकी नगरमध्ये झालेल्या अपघातात बालक जागीच ठार तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संकल्प सचिन कोळी (रा. अब्दुलला, ता. शिरोळ) असे मृत बालकाचे नाव तर कविता कोळी या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बोरगाव शहर लागूनच काही अंतरावर वाल्मिकी नगर आहे. तेथील नातेवाईकांना भेटण्यासाठी सचिन कोळी दुचाकीवरून गेले होते. वाल्मिकी नगरातील रस्त्याकडेला दुचाकी लावून पुढे जात असताना बोरगावहून कुरुंदवाडे जाणाऱ्या मोटारीने (क्र. एम. एच. ०९ एफ.क्यू. ८७८९ ) सचिन यांच्या पत्नी कविता आणि संकल्प याला जोराची धडक दिली. त्यामध्ये संकल्प याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कविता या गंभीर जखमी झाल्या आहेत. रात्री उशिरा शवविच्छेदन करून बालकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सचिन कोळी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून इचलकरंजी आणि सदलगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta