ज्वारी ४० ते ५० रुपये किलो; उत्पादन क्षेत्र घटल्याचा परिणाम
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामात उत्पादनातील घटीमुळे ज्वारी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. गतवर्षे २८०० ते ३००० रुपये क्विंटल मिळणाऱ्या ज्वारीचे दर आता ४००० ते ४५०० रुपयावर पोहचल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील भाकरी गायब होण्याची वेळ आली आहे. या दरवाढीमुळे ‘भाकरीचा चंद्र’ महागल्याचे चित्र निपाणी भागात दिसत आहे.
पेरणीपासूनच पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, अधिकच्या थंडीमुळे पिकवाढीवर झालेला परिणाम, पाखरे राखणीसाठी मनुष्यबळाची कमतरता, पेरणीपासून काढणीपर्यंत वाढलेल्या अडचणीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच ज्वारीच्या उत्पादनातील घटीमुळे दरात वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपये किलो ज्वारीचे दर पोहचल्याने सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर ज्वारी गेली आहे.
ज्वारीने पचनशक्तीत सुधारणा, हृदयरोगामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत आदी फायदे आहेत. ज्वारीमध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिज द्रव्ये, कॅल्शियम हे मानवी आरोग्यास गुणकारी घटक आहेत. काही वर्षांपूर्वी चपाती, पोळी सामान्यांच्या घरी सणासुदीलाच होत असे. ज्वारीची भाकरी हीच सामान्यांच्या जीवनातील दररोज भुकेला उपयोगी पडणारी होती. सोयाबीनच्या दरातील वाढ, ऊसासह बागायतीक्षेत्राचा शेतीतील वाढलेला टक्का याशिवाय इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे ज्वारी विकत घेणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे.
——————————————————————–
‘यावर्षी विविध कारणामुळे ज्वारी पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. शिवाय चिकटा रोग व इतर किडीमुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने यंदा ज्वारीचे दर भडकण्याची शक्यता आहे.’
-अशोक पाटील (अमरगोंडा), शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta