नागरिकांची वखारीकडे धाव; उपनगरांसह ग्रामीण भागात पेटल्या चुली
निपाणी (वार्ता) : इस्त्राईल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युध्दाचे परिणाम देशातील गॅस वितरण व्यवस्थेवर झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हॉटेल मालकांनी लाकडाचा पर्याय निवडला आहे. घरगुती सिलिंडरचा जास्त दिवस पुरवठा होण्यासाठी सर्वसामान्यांनीही आपला मोर्चा लाकडाकडे वळविला आहे. त्यामुळे निपाणी व ग्रामीण भागातील लाकडांच्या वखारीमध्ये गर्दीं होत आहे. आठ-दहा दिवसांपासून शहरात दररोज सुमारे ६ ते ७ टन लाकडाची विक्री होत आहे. यामध्ये बाभूळ चिंच, कडुलिंब लाकडासह सालीच्या चुऱ्याचा समावेश आहे.
आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत. तरीही गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिवाय गॅसचे बुकिंग होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दररोज गॅस वितरण केंद्र परिसर गदीं फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. सिलिंडर मिळत असले तरी ही युद्धजन्य परिस्थिती आणखी किती दिवस राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून हॉटेलचालकांसह आता नागरिकांनीही आपला मोर्चा पुन्हा एकदा पारंपरिक इंधन म्हणून लाकडाकडे वळविला आहे. निपाणी शहरात आठ आणि ग्रामीण भागात सहा लाकडाच्या वखारी आहेत. नागरिकांनी आता चुलीसह बंबाचा पुन्हा वापर सुरू केला आहे.
——————————————————————–
सिलेंडर मिळत नसल्याने अनेकांनी घरातील गॅस गिझर बंद केले आहेत. पाणी तापविण्यासाठी बहुतेकांनी अडगळीत ठेवलेले बंब बाहेर काढले आहेत. शिवाय हॉटेल चालकाकडून लाकडाची खरेदी होत आहे. वाढली आहे. आठवड्यापासून लाकडासह भूशाला मागणी वाढली आहे त्यासाठी वखारीकडे नागरिक वळत आहेत.’
–दिलीप पटेल, लाकूड वखारदार, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta