
एकरी १५००, तर १२०० रुपये रोटर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका
निपाणी (वार्ता) : ट्रॅक्टरद्वारे शेत मशागत महागली असून नांगरणीचा दर एकरी १५०० तर रोटाव्हेटरचा दर एकरी १२०० रुपयांवर पोचला आहे. लागवडीपासून ते मशागतीपर्यंत सर्वच खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतमालाचे दर अजूनही दहा वर्षांपूर्वीच्या पातळीवरच ठप्प असल्याने निपाणी भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बियाणे, खत, कीटकनाशके, तणनाशके, फवारणीच्या औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढल्याने शेती करणे खर्चिक झाले आहे. बहुतांश शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरवर अवलंबून असल्याने या वाढीचा थेट परिणाम त्यांच्यावर होत आहे. ट्रॅक्टर मालकांच्या मते डिझेलच्या दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढविणे अपरिहार्य झाले आहे. नांगरणीसाठी प्रतिएकर ६ ते ७ लिटर डिझेल लागतेतर इतर कामांसाठी ३ते ४ लिटर डिझेल खर्च होते. अलीकडे इंधन टंचाईच्या अफवांमुळे काही दिवस डिझेल उपलब्ध न झाल्याने कामे ठप्प होत आहेत. सोयाबीन व हरभरा पिकाचे उत्पादन समाधानकारक झाले असले तरी बाजारभावात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च व मिळणारा दर यात मोठी तफावत आहे. वाढत्या खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
——————————————————————–
‘बियाणे, खत, औषधे महाग झाले आहे. एक एकर शेती करायला पूर्वीपेक्षा दुप्पट खर्च येत आहे. पण पिकाला घर नसल्याने हातात काहीच राहत नाही. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे.
-अशोक पाटील, अमरगोंडा, शेतकरी बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta