
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांची चाहूल लागताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव अयशस्वी झाला. सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना दोघा संशयितांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फैयाज कोलार व तोहिद मुजावर (रा. कबनूर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये अनेक उद्योग सुरू आहेत. त्यापैकी सागर माने यांच्या मालकीचा रजतयोग टेक्स्टाईल हा कारखाना आहे. अज्ञात चोरट्यांनी या कारखान्यात घुसून एयर जेट मशीनमधील महागडे मदरबोर्ड व इतर साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ कारखानदारांना माहिती दिली.
संशयित आरोपींची चौकशी केली असता फयाज कोलार याने चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली, तर तोहिद मुजावर याने आम्ही एकूण पाच जण आलो होतो, अशी माहिती दिली. यामध्ये असलम मुजावर, मोहसीन पटेल आणि सहील टेटेकर हे तिघे साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. तर दुचाकी स्कूटी व होंडा कंपनीची शाईन गाडी बिना नंबर प्लेट घटनास्थळी मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सागर माने यांनी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत. घटनास्थळी नगराध्यक्ष दिंगबर कांबळे व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष बी. के. महाजन यांनी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta