Sunday , April 5 2026
Breaking News

वळीवाच्या दमदार सलामीने घरांचे छत उडून तंबाखूसह ज्वारीचे चार लाखाचे नुकसान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील वळीवाने गुरुवारी (ता.२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दमदार सलामी दिली. या पहिल्या पावसातच सर्वांची रेघा त्रिपीट उडाली. अचानक आलेल्या या वळीव आणि वादळी वाऱ्यामुळे येथील केसरकर मळातील दोन घरांचे छत उडाल्याने घरातील तंबाखू, ज्वारी आणि कडबाकुट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केसरकर कुटुंबीय अडचणीत आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील अनेक दुकानावरील शेड, मोठे होर्डिंग खाली कोसळले. पण दुर्दैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्यावरील वृक्ष मुख्य रस्त्यावर कोसळला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांनी झाडाची तोडणी करून बाजूला केले. तोपर्यंत त्या मार्गावर बस सेवा व इतर वाहतूक बंद होती. केसरकर मळ्यातील बापू केसरकर आणि वसंत केसरकर यांच्या घराचे छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. त्यामुळे घरातील १७ बोध तंबाखू, १२ पोती ज्वारी आणि ४० बोद कडबाकुट्टी पूर्णपणे भिजले आहे. याशिवाय शेजारी असलेल्या म्हशीच्या गोठ्यावरील छतही उडून नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या दोन्ही कुटुंबीयांचे सुमारे चार लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे. छत उडून जाताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तंबाखू आणि ज्वारी भिजण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाऊस मोठा असल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याशिवाय तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाला या घटनेची माहिती दिली.
शहरातही अनेक ठिकाणी गटारी तुंबून कचरा रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना ये -जा करणे कठीण झाले होते. एकंदरीत पहिल्यांदाच पडलेल्या वळीव पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *