Sunday , April 5 2026
Breaking News

ऐन सुगीत निपाणी भागात ‘वळीवा’चे धुमशान

Spread the love

 

वादळी वाऱ्यासह पाऊस; मालमत्ता नुकसानीसह आंबा, भाजीपाल्याला फटका

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात गुरुवारी (ता. २) निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसला. बहुतांश ठिकाणी विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे आंबा, केळी, भाजीपाला अशी हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय घर, गोठे अशा मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

वादळी वारा आणि पावसाबरोबर अनेक ठिकाणी वीज पडली असून त्यामध्ये झाडांना आग लागण्याच्या किरकोळ घटना वगळल्या तर सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. काही ठिकाणच्या शेतातील सोलार सिस्टिम खराब झाल्या आहेत. तर वीज खांब कोसळण्यासह वाहिन्या तुटून पडल्या आहेत. आंबा भाजीपाल्यासह कलिंगड शेतीलाही या पावसाचा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी फुलांच्या बागा आडव्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा मोडून पडल्या आहेत. सध्या केळी छाटणीला आले असताना झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हाताश बनला आहे. उशिरा पेरणी केलेली ज्वारी आणि गहू कापणीची मळणीची कामे काही ठिकाणी शिल्लक आहेत. ही पिके भिजल्याने ती काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय ज्वारीचा कडबा भिजल्याने त्याची प्रत खालावणार आहे.
——————————————————————-
ऊन-सावलीचा खेळ अन् हवेत गारवा
गुरुवारी सकाळपासूनच निपाणी परिसरात ढगांची गडद छाया पसरली होती. दिवसभर कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण असा ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. या बदललेल्या हवामानामुळे दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सायंकाळी वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना या गारव्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र ‘नुकसानी’चे पाणी तरळले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *