
दुसऱ्या सिलेंडरसाठी ४५ दिवसांची अट : ऑइल शेगडीचाही वापर
निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसापासून शहरात गॅस पुरवठा कमी जास्त प्रमाणात विस्कळित होत असल्याने निपाणीसह परिसरातील लहान मोठे हॉटेल व ढाबा व्यवसाय संकटात सापडला आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यामध्ये ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
ऐन उन्हाळ्यात गॅससाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून, हतबल झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी तसेच गृहिणींनी पुन्हा चुलीचा आधार घेतला आहे. हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अनेकांनी लाकडाच्या भट्टया, कोळसा किंवा जळक्या ऑइलच्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. गॅस बुकिंगसाठी अनिवार्य करण्यात आलेली ‘ई-केवायसी’ प्रक्रिया तसेच दुसऱ्या सिलिंडरसाठी असलेली ४५ दिवसांची अट यामुळे ग्राहकांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले असून ग्रामीण भागात पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याचे चित्र दिसून येत आहे.
——————————————————————–
‘गॅस पुरवठा विस्कळित झाल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. शिवाय ग्राहकांना लागणारा नाष्टा वेळेत बनवणे अशक्य होत आहे. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी होत असून त्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम होत आहे.’
– संदीप खडके,
हॉटेल व्यवसायिक, निपाणी
——————————————————————-
‘मध्यंतरीच्या काळात लोड येत नसल्याने गॅस पुरवठा विस्कळीत झाला होता. पण आता तो कमी झाला असून ग्राहकांना नंबर लावल्यानंतर त्यांना सिलेंडर दिले जात आहे. शिवाय गॅस सिलिंडर नियम लागू झात्याने ही गर्दी दिसून येत आहे.’
– गजेंद्र तारळे,
गॅस एजन्सी चालक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta