मान्यवरांची उपस्थिती : आठवडाभराच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता
निपाणी : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष आणि निपाणी परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल.) येथे मंगळवारी (ता.१५) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा वाटप आणि आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रारंभी युवानेते उत्तम पाटील आणि ममदापूर येथील निरंजन पाटील (सरकार) यांच्या हस्ते माऊलीच्या अश्वाचे पूजन करून रिंगण सोहळ्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून उभा रिंगण सोहळा पार पडला यावेळी मदापुर अक्कोळ, गळतगा परिसरातील वारकरी आणि भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी रिंगण सोहळा मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
मंगळवार (ता.८) पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झाला होता. त्यावेळी वीणा, पालखी, प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन शंकरदादा पाटील, तुकाराम शिंदे- महाराज, सागर केसरकर, बबन बेलेकर, पंडित साळुंखे, नरसु पाटील, अजित शिंदे, वसंत नलवडे यांच्या उपस्थितीत झाले. सोहळा काळात पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ६.३० वाजता प्रवचन, रात्री ९ वाजता कीर्तन व त्यानंतर हरिजागराचा कार्यक्रम झाला. सोमवारी (ता.१४ ) अंबिका देवालयात अश्वाचे आगमन व अश्वपूजन झाले. मंगळवारी (ता. १५) दिंडी काढण्यात आली. यानंतर दऱ्याचे वडगाव येथील धोंडीराम मगदूम महाराज यांचे काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी बारा वाजता माऊलीच्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महारुद्र स्वामी, ग्रामपंचायत अध्यक्ष अमरसिंह पाटील, रावसाहेब गोरवाडे, प्रकाश पाटील, गजानन कावडकर, उत्तम पाटील, मोहन पाटील, पांडुरंग हरेल, बालाजी मगदूम, मधुकर उत्तुरे, शेखर पाटील, संदीप तोडकर, महादेव मधाळे, शंकर इंगळे( गुरुजी), रामचंद्र गोरवाडे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.