घरांचे मोठे नुकसान : उत्तम पाटील यांच्याकडून तातडीने मदतीचा हात
निपाणी : शनिवारी (ता. १९) बोरगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरावरील छत उडून गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले तर काही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच युवानेते उत्तम पाटील यांनी बोरगाव परिसरातील या कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बोरगाव परिसराला झोडपून काढले. त्यामुळे व्यावसायिक आणि कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळे बोरगाव येथील माळभाग, आर. के. नगर, कुंभार माळमधील अनेक घरावरील छत उडून गेले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्यही खराब झाले असून अनेक कुटुंबांना वळीव पावसाचा फटका बसला. या परिसरात अनेक सर्वसामान्य कुटुंबे असून त्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांच्या घराचे छप्परच नष्ट झाले आहे. शिवाय अनेकांच्या घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत. वादळी वाऱ्यात मथुरा तुकाराम खोत यांच्या घरावरील सुमारे ३६ पत्रे, जैनफ इसाक केरुरे यांच्या घरावरील छत, सरदार भैरूपी यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. तसेच सुभाष कडोले यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे पडल्याने म्हशीला दुखापत झाली आहे. रिहाना बिसाई, धोंडीराम भोरे, राजू कांबळे, गणी मकानदार, सुभाष कडोले, राजू हवले, बशीर दाडीवाले, विक्रम शिंगाडे यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. तर टेक्स्टाईल पार्क येथील भिंत कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले.
त्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबीय चिंतेच्या सावटाखाली वावरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील आणि सहका-यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांची तात्काळ भेट देऊन मानसिक धीर व आधार दिला. याशिवाय लागलीच शासनापूर्वीच तातडीची मदत म्हणून रविवारी (ता.२०) नुकसानग्रस्त सर्व कुटुंबाना छतासाठी पत्रे व लागेल ती मदत देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन मदतीसाठी कार्यवाही चालू केली. त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे बोरगाव परिसरात यांचे कौतुक होत आहे.