




राजू पोवार : भाटनांगनुर येथे ’रयत’च्या शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही याकडे शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष शेतकरी अडचणीत येत आहे. शासनातर्फे शेतकर्यांसाठी अनेक कायदे असूनही त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होत नाही. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे. त्यामुळे शेतकर्यांना आंदोलन मोर्चे करावे लागत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन कर्नाटक राज्य संघटना व हरित सेनेतर्फे शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांनी संघटित होऊन संघटनेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले तर सर्व शेतकर्यांना न्याय देणे शक्य होईल, असे मत कर्नाटक राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. भाटनांगनूर येथे कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगराव पाटील होते.
प्रारंभी शाखा अध्यक्ष राजाराम पाटील यांनी स्वागत केले. हालसिद्धनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात चैतन्य महाराजांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाले. संघटनेचे निपाणी शहर अध्यक्ष उमेश भरमल यांनी प्रास्ताविक केले.
राजू पोवार म्हणाले, गेल्या सहा महिन्यात अनेक शेतकर्यांचा ऊस शॉर्टसर्किटने जळाला आहे. अशा शेतकर्यांना न्याय मिळवून दिला आहे. या शिवाय पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय महामार्ग शेजारील जमिनी शासनाला देण्यासाठी प्रयत्न असतानाही तो हाणून पाडला आहे. यापुढील काळातही शेतकर्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेनेच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
संघटनेचे ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर यांनी ही शेतकर्यांच्या प्रश्नासाठी संघटनेची आग्रही भूमिका असल्याचे सांगितले. रंगराव पाटील, सुभाष चौगुले, चैतन्य महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संजय जाधव, ग्रामीण सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, विवेक जनवाडे, नामदेव साळुंखे, शरद भोसले, रमेश गळतगे, बबन जामदार, चीनु कुळवमोडे, अनंत पाटील, शिवगोंडा निकम, नानासाहेब कुंभार, संजय जाधव, प्रमोद पाटील, उमेश पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, सागर पाटील, उमेश देसाई, पंकज पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta