चाँदशिरदवाड मोरया ग्रुपचा उपक्रम : वीट भट्टीवरील मजुरांना दिलासा
निपाणी (विनायक पाटील) : चाँदशिरदवाड (ता. निपाणी) येथील मोरया ग्रुपचा सक्रीय कार्यकर्ता व अनेक मित्रांचा जिवलग असलेला रजत नलवडे यांचा गेल्या वर्षी कोरोना काळात मृत्यू झाला. हा मृत्यू नलवडे कुटुंबिय व सर्व मित्रांच्या जिव्हारी लागला. एक सच्चा दिलदार मित्र ऐन तारुण्यात गेल्याने एका चांगल्या मित्राला सर्वजण पोरके झाले होते. त्याची आठवण नेहमी स्मरणात राहावी, या उद्देशाने रजतच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र परिवार व मोरया ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी बोरगाववाडी येथे कामावर असलेल्या वीटभट्टी कामगाराना जीवनावश्यक वस्तूचे कीट देऊन आपल्या मित्राची आठवण म्हणून स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
बोरगाववाडी विटभट्टी येथे आपल्या कुटुंबासह कामावर असणार्या बावीस कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पांडुरंग खोत म्हणाले, रजत नलवडे जरी आमच्यात नसला तरी त्याची आठवण आमच्या सोबत कायम राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही रजतच्या वाढदिवसानिमित्त इतर वायफळ खर्च न करता त्याच रकमेतून वीटभट्टी कामगारांना किट वाटप करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला. माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा तो कसा जगला, हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी संतोष चव्हाण, राजू खोत, संदीप तोडकर, अक्षय स्वामी, पोपट रोहिदास, चंदू खोत, फिरोज चाऊस, चेतन नलवडे, गणेश मिरगे, महावीर पाटील, निलेश पाटील, अमर मगदूम यांच्यासह मोरया ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
