
वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द : देहदानाची बेनाडीतील पहिलीच घटना
निपाणी (वार्ता): बेनाडीतील ज्येष्ठ नागरिक निवृत्त शिक्षक भीमराव संभाजी जनवाडे यांचे गुरुवारी (ता.७) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केला होता. त्यानुसार त्यांचा मृत्यूदेह बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुपूर्द करण्यात आला.
भीमराव संभाजी जनवाडे (वय ७२) यांनी १ ऑक्टोबर २०१९ रोजी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून देहदान संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यांना त्या संदर्भात प्रशंसा पत्रही देण्यात आले होते.
भीमराव संभाजी जनवाडे यांनी बीएड ही पदवी घेतल्यानंतर अतिथि शिक्षक म्हणून निपाणी जवळील स्तवनिधी या ठिकाणी काही काळ शिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर कणकवली येथील एस. एम. हायस्कूल शिवाजी मेमोरियल याठिकाणी २९ वर्षे ज्ञानदानाचे काम केले. निवृत्तीनंतर ते बेनाडी येथेच वास्तव्यास होते.
देहदानाचा संकल्पनेबद्दल आपले विचार त्यांनी जाहीर केला होते. यामध्ये त्यांनी जन्म आकस्मिक असला तरी मृत्यू मात्र अटळ आहे. प्रत्येक जण संपूर्ण जीवनात स्वतःसाठी व परिवारासाठी धडपडत असतो. आपण समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने व्यतीत करत असतो. पण मृत्यूनंतर काय याचा विचार कोणीही करत नाही. हाच धागा धरून आपला मृतदेह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगात यावा, यासाठी त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प जाहीर केला होता.
भीमराव जनवाडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांचे भाऊ अर्जुन जनवाडे यांनी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयासमधील शरीररचनाशास्त्र विभागाशी संपर्क साधून या घटनेची नोंद दिली. त्यानुसार या विभागातील डॉक्टर व त्यांचे सहाय्यक यांनी येऊन घरातील रितसर विधी आटोपल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन बेळगावकडे रवाना झाले.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, तीन भाऊ असा परिवार आहे. बेनाडी परिसरातील देहदान करण्याची ही पहिलीच घटना असल्याने भीमराव जनवाडे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा गावात होत होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta