
माजी सैनिक सदाशिव शेटके यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
निपाणी (वार्ता) :गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात अनेक गावातील घरासह पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात हदनाळ (ता. निपाणी) येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ग्रामपंचायतीतर्फे सर्वे करून त्यातील काहींचे कमी नुकसान होऊनही अधिक भरपाई दिले गेले तर खरे नुकसानग्रस्त बाजूला राहिले. या प्रकरणी संबंधित बोगस लाभार्थीवर कारवाई करावी. याबाबत तात्काळ निर्णय देण्याची मागणी केली होती. पण त्याला महिना उलटूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने रयत संघटनेतर्फे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (ता.१८) आपण आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा हदनाळ येथील रयत संघटनेचे शाखा अध्यक्ष व माजी सैनिक सदाशिव शेटके शेटके यांनी दिला आहे.
ते येथे आयोजित पत्रकार बैठकित बोलत होते.
सदाशिव शेटके म्हणाले, नुकसानी नंतर गरजु लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून नुकसान भरपाई देण्याची मागणी आपण केली होती. पण त्या प्रकरणी आपली बाजू ऐकून न घेता तुकाराम विठ्ठल राजुगडे, धनाजी बाबुराव पडेकर, सूरज धनाजी पढेकर, ऋषिकेश तुकाराम राजुगडे व युवराज रामदास पेडेकर यांनी आपणाला मारहाण केली. शिवाय सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तुकाराम राजुगडे हे शिक्षक असून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तरीही शासनाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करत त्यांनी लाभार्थ्यांच्या यादीत आपले आणले आहे. याचा खुलासा आरटीआय अंतर्गत माहिती मागविल्यानंतर झाला आहे. या संदर्भातील आपण निपाणी तहसीलदार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे , ग्रामपंचायत आप्पाचीवाडी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूला दिला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याविषयी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत निर्णय न झाल्यास सोमवारपासून (ता.१८) आपण आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेटके यांनी दिला आहे. याबाबत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडी पोलीस उपाधीक्षक, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक आणि निपाणी पोलिसांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta