Friday , October 18 2024
Breaking News

निमंत्रितांच्या कवितांनी रसिक चिंब

Spread the love
पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग 
निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात ती स्वप्ने प्रत्येक कवी शब्दातून त्या उतरविण्याचा प्रयत्न करतो अशीच कविता सासरे आणि जावयाच्या संभाषनावरून काशिद यांनी सादर केली. एकापेक्षा एक कवींनी वेगवेगळ्या धाटणीच्या कविता सादर केल्याने रसिक चिंब झाले होते. प्रा. डाॅ. अच्युत माने यांच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन हलकर्णी येथील प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांनी बहारदारपणे केले.
कोडोली येथील बबलू वड्डर यांनी ‘व्हायरस’ कविता सादर करताना ‘स्वप्न डाऊनलोड होत नाही, त्याला संवेदनाचा व्हायरस आलाय, हँग झालेल्या पीसीसारखी काँटॅक्ट लिस्ट वाढली पण संवाद कमी झाला. त्यातूनच मदरबोर्ड आयुष्यातून निघून गेला. तर संपूर्ण घरच फाॅरवर्ड झाले’ ही कविता सादर करून सध्याच्या विज्ञान युगातील आपण गुलाम बनल्याचे स्पष्ट केले.
नागठाणे येथील रमजान मुल्ला यांनी ‘बुका झालो, गुलाल झालो, अभीर झालो, कबीर झालो या कवितेतून मरणानंतरच्या वेदना स्पष्ट केल्या. तर ‘देहाला फुटले पाने, पानातून येते गाणे’ कविता सादर करून कवीला विचारणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली. मंगसुळी येथील आबा पाटील यांनी ज्ञानदेवा कविता सादर करताना ‘संतांचा बाप असतो तो ज्ञानदेवाच ग्रेट असतो एके दिवशी दगड मातीची भींतच चालविली, तीपण चोबलसिट, एवढा चमत्कारी नव्हता आमचा बाप, पण त्याने चालविले चार भींतीचे घर’ ही कविता सादर करून जागलेल्या वेदना शब्दात उतरविल्या.
अंकलखोप येथील लता ऐवळे यांनी धागा कविता सादर करताना ‘तुझ्या मनगटावर दादा बांधला मी धागा, ठेव काळजाच्या तुझ्या कोपरयात मला थोडी जागा’, या ओळी सादर करून बहिण भावाचे नातेसंबंध स्पष्ट केले. कोनवडे येथील गोविंद पाटील यांनी पन्नाशीच्या वाटेवर नेटपार गुरुजी ही कविता सादर करून पूर्वीचे आणि सध्याच्या शिक्षणावर बोट ठेवून मोबाईल आणि शाळेतील शिक्षणावर भाष्य केले. यावेळी सर्वच कवींनी प्रत्येकी दोन कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास अशोककुमार असोदे, प्रा. डाॅ. अच्युत माने, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. नामदेव मधाळे, बाबासाहेब मगदूम, अमृत्त ढोले, गोरखनाथ मधाळे, मोहन घस्ते, प्रा. सुरेश कांबळे, बाळासाहेब ऐवाळे, सुनील शेवाळे यांच्यासह रसिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *