
पहाटे 4.15 पासून दृश्य : सृष्टीचा अदभुत नजारा
निपाणी (विनायक पाटील) : खगोलीय घटनांमध्ये रविवारी (ता.1 मे) पहाटे पूर्व दिशेला गुरू-शुक्र या ग्रहांच्या महायुतीचा अनुभव घेण्याचा विलक्षण योग आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु व सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र हे यावेळी एकमेकांच्या एकदम जवळ आलेले आपल्याला दिसतील. दरवर्षी ते एकमेकाच्या जवळ येतात. पण यावेळी ते खूपच जवळ येणार असल्याने हा नजारा पाहण्याची संधी खगोलप्रेमीसह विज्ञानप्रेमी नागरिकांना मिळणार आहे.
युती म्हणजेच एकाच राशीत दोन किंवा अधिक ग्रह एकत्र येतात, अशा स्थितीला ग्रहांचा संयोग म्हणतात. एप्रिल महिन्यात मीन राशीत शुक्र आणि गुरू या दोन प्रमुख ग्रहांचा संयोग होणार आहे. मीन राशीतील या दोन ग्रहांची युती या वर्षातील अद्भुत खगोलीय घटना आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मीन रास ही गुरु ग्रहाची स्व-रास आहे. 12 वर्षांनी गुरु ग्रह स्वतःच्या राशीत येत आहे. गुरु ग्रह 13 एप्रिल 2022 रोजी मीन राशीत विराजमान झाला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत गुरु ग्रह मीन राशीत असेल. दुसरीकडे, शुक्र ग्रहाने देखील 27 एप्रिल 2022 रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीत दोन ग्रहांची युती होईल.

13 एप्रिलपासून 1 मेपर्यंत गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह यातील पृथ्वीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे. ज्यामुळे गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह हे वेगवेगळे न दिसता एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथ्वीवरून दिसेल. पृथ्वीवर हा देखावा विषुववृत्तावर सर्वात उत्तम दिसणार आहे. याचा परमोच्च क्षण हा 1 मे रोजी पहाटे असणार आहे. या दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर खूप कमी असल्यामुळे पृथ्वीवरून हे दृश्य फार विलोभनीय असणार आहे.
गुरू हा ग्रह आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात मोठा ग्रह आहे. म्हणजे गुरु हा मोठा भोपळ्याएवढा असेल तर शुक्र हा ग्रह जेमतेम बोरे किंवा आवळ्याइतका लहान आहे.
पहाटे संपूर्ण अंधार असल्याने ही महायुती अधिक चांगली दिसेल. साध्या डोळ्यांनी देखील दृश्य दिसणार आहे. दुर्बीण असल्यास अधिक चांगले निरीक्षण आणि फोटोग्राफी देखील करता येऊ शकेल. दुर्बिणीतून पट्टेदार तेजस्वी गुरु व त्याचे 4 प्रमुख उपग्रह आणि तेजस्वी शुक्र ग्रह असे सुंदर दृश्य एकाच फ्रेम मध्ये दिसेल.
त्यामुळे या आठवड्यात तुम्ही पहाटे आकाशदर्शन केल्यास तुम्ही या महायुतीचा आनंद, मनमुराद घेऊ शकता.
—-
’खगोलीय घटना पहाताना हा महायुतीचाच नव्हे तर, कोणताही खगोलीय चमत्कार बघण्यामुळे काहीही अनुचित होत नाही. अर्थात सूर्यग्रहणासारख्या काही गोष्टी बघताना डोळ्यांचे नुकसान होऊन अंधत्व येऊ नये, म्हणून काही खबरदारी घ्यावी लागते. ती घेतली की, खगोलीय चमत्कार बघण्यासारखे स्वर्गसुख नाही. हा चमत्कार साध्या डोळ्याने देखील दिसू शकतो. द्विनेत्री अथवा दुर्बीण असल्यास हेअधिक उत्तम पहाता येणार आहे.’

– एस. एस. चौगुले, विज्ञान शिक्षक, कुर्ली हायस्कूल.
Belgaum Varta Belgaum Varta