राजू पोवार : प्रांताधिकार्यांच्या चर्चेनंतर निर्णय
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही अनेक समस्यांची उकल झालेली नाही. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याशी येथील शासकीय विश्रामधामात बुधवारी (ता.११) दुपारी चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते.
पडलिहाळ येथील पिकेपीएसमध्ये गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. शेतकऱ्यांची पत असूनही त्यांना कर्जा विना दूर राहावे लागत आहे. यासंदर्भात चिक्कोडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रयत संघटनेतर्फे वेळोवेळी तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी कामगौडा यांनी संबंधित संघाची जनरल बॉडी बैठक घेऊन योग्य त्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे आवाहन केले.
बेनाडी येथे शिवापूर वाडी फाट्यानजीक भाडेतत्वावर जागा घेऊन मद्य दुकान सुरू आहे. तेथे मद्यपी नागरिक मद्यप्राशन करून जवळच्या शेतातच रिकाम्या बाटल्यासह काही मद्यधुंद नागरिक शेतातच ठिया मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. याशिवाय शिवापुरवाडी, गजबरवाडी येथील एका शेतकऱ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे रस्त्या अभावी मोठे नुकसान होत आहे. दोन वर्षापासून अतिवृष्टी व महापुरामुळे अनेकांची घरे पडले असून पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा सर्व समस्या तत्काळ निकालात निघाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचे राजू पोवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी उमेश भारमल, संजय स्वामी, प्रा. मधुकर पाटील, संतोष मोरे, प्रकाश सासणे, सचिन पाटील, बाळू पाटील, अनिकेत खोत, सर्जेराव हेगडे, वसंत पाटील, रघुनाथ गळतगे, सदाशिव शेटके, शिवाजी वाडेकर, बाळासाहेब कांबळे, रमेश गळतगे, राजाराम पाटील, संजय पाटील, पवन माने, महादेव शेळके,तानाजी पाटील,चेतन पाटील, अप्पासाहेब कांबळे, वसंत पोवार, संदीप दाभाडे, आप्पासाहेब पाटील,आनंदा दाभाडे यांच्या शहर रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.