पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी : शाळांमध्ये विविध उपक्रम
निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद चालू होत्या. पण या वर्षी संसार कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवार (ता.16) पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 15 दिवस आधीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रविवार (ता.15)पासून घरोघरी पालकवर्ग आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याच्या तयारीला लागला होता. रविवारी पालक व विद्यार्थ्यांनी दप्तर वह्या व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
आज सकाळपासून शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थीची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. त्यामुळे शहरातील शाळांकडे जाणार्या रस्त्यांवर गणवेशातील मुलामुलींची गर्दी पहावयास मिळत होती. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. शिक्षक वर्ग तर गेल्या शनिवारपासूनच शाळेत दाखल झाला होता. शनिवार आणि रविवारी शाळांची स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे रविवारी बर्याच शाळांमध्ये एसडीएमसी समिती व पालकांची बैठक घेण्यात आली. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरणे बांधण्याबरोबरच कांही शाळांमध्ये प्रवेशद्वारावर आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रत्येक शाळेत शिक्षकवर्ग विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सुहास्यवदनाने आणि उत्स्फूर्त स्वागत करताना दिसत होता. वार्षिक परीक्षेच्या सुट्टीनंतर आपला मित्र-मैत्रिणीसह सुट्टीनंतर गट पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींचा चेहर्यावर आनंद दिसत होता. पहिला दिवस असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे बरीच भावंडे एकमेकांचा हात हातात धरून गणवेशात शाळेला येताना दिसत होती. काही शाळांनी बैलगाडीद्वारे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मिरवणूक काढली. तर शहरातील हरी नगर येथील शाळेत रिक्षा घेऊन विद्यार्थ्यासाठी जनजागृती केली. यावेळी सुनील शेवाळे, एम. ए. खानापुरे, सुजाता कांबळे, के. एम. नलवडे, सोनाली खवरे, अश्विनी चव्हाण यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड पदार्थ देऊन त्यांचे स्वागत केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे पहिल्या दिवशी मिळणार्या दुपारच्या माध्यान्ह आहारासोबत किमान एक गोड पदार्थ देण्याचे निर्देश दिले आहेत. निपाणी शैक्षणिक तालुक्यातील शाळा महिन्याभरानंतर आजपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. कोरोना जरी कमी झाला असला तरी आवश्यक सर्व ती खबरदारी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे.
बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी वैशाली देशमाने, स्वाती चव्हाण, भाग्या खटावकर, महानंदा बक्कनावर, नंदीनी पाटील, प्राची शहा, शाहिस्ता सय्यद, भारती चौगुले, वर्षा केनवडे, प्राचार्य दीपाली जोशी, ज्योती हरदी, जयपाल कुडचे आणि उपाध्यक्ष उदय पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
—-
बैलगाडी सजवून मिरवणूक
यरनाळ येथील प्राथमिक शाळेत शाळा प्रारंभ उत्सवानिमित्त बैलगाडी सजवून वाद्याद्वारे गावभर मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले. तर शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व शैक्षणिक वस्तू भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर अंबिका जवळजवळ पालक व विद्यार्थ्यांनी देवदर्शन घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत तावदारे यांच्यासह शिक्षक व शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta