हुन्नरगीत दिवाळी : वडीलांच्या कष्टाचे केले चीज
निपाणी (विनायक पाटील) : अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज कसरत होत आहे. अशातच शिक्षणासाठी वाढलेला खर्च सर्वसामान्य कुटुंबांना पेलवत नाही. तरीही आपल्या मुलांना शिक्षण देण्याची जिद्द ठेवून हुन्नरगी येथील टेम्पो चालक दत्तात्रय शिवाप्पा किल्लेदार यांनी टेम्पोवर चालक म्हणून काम करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. त्याची जाणीव ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून त्यांचा मुलगा सुदेश यांने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या यशामुळे हुन्नरगी गावात दिवाळी साजरी केली.
दत्तात्रय किल्लेदार यांची केवळ अर्धा एकर शेती आहे. त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांनी बँकेतून कर्ज काढून मालवाहतूक टेम्पो खरेदी केला. गेल्या दहा वर्षापासून आपल्या मुलाला व मुलीला चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. कोरोना काळात मालवाहतूक टेम्पोला काम असल्याने दुसऱ्याची सात एकर शेती कसून त्यांनी कुटुंबाला उभारी दिली आहे. सुदेश याचे गळतगा व हुन्नरगी येथे प्राथमिक शिक्षण झाले. वडील दत्तात्रय हे निपाणी शहर टेम्पो मालवाहतूक संघटनेचे सदस्य आहेत. आपल्या मुलातील शैक्षणिक गुणवत्ता पाहून त्यांनी पैशाचा विचार न करता मुडबिद्री येथील शिक्षण संस्थेत आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणासाठी दाखल केले. तेथे कोणत्याही प्रकारची टेन्शन न घेता केवळ वडिलांची प्रेरणा व कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास केल्याने तो दहावी परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये अव्वल ठरला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे निपाणी व परिसरात तोंड भरुन कौतुक होत आहे.
—————————————————————–

‘आपल्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. आई-वडिलांनी कष्ट करून आपल्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्थेत मी शिक्षण घेऊ शकलो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते.’
– सुदेश किल्लेदार, विद्यार्थी
————————————————————–

‘आपल्याला मुलगा व मुलगी अशी दोन आपत्ये असून मुलीची आता दहावी परीक्षा संपली असून तिलाहीत्रचांगले यश मिळेल असा विश्वास आहे. मुलाने आपल्या कष्टाचे चीज केल्याने घरात दिवाळी साजरी केली.’
-दत्तात्रय किल्लेदार, पालक, हन्नरगी
Belgaum Varta Belgaum Varta