तिसर्या आघाडीचे तहसीलदारांना निवेदन : कोरोनामुळे मयत कुटुंबियांना भरपाई द्यावी
निपाणी (संजय सुर्यवंशी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शेतकर्यांची कर्जमाफी करण्यासह लहान-मोठ्या व्यवसायिकांना अनुदान देण्याच्या मागणीचे निवेदन चिकोडी तालुका तिसरी आघाडीतर्फे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना आघाडीचे अध्यक्ष राजू पोवार व पदाधिकार्यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कोविड-19 महामारीने सर्व सामान्य मेटाकुटीला आला आहे. त्यांच्या जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत द्यावी. मयताच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. गरीब कुटुंबांमध्ये अन्नधान्य वितरण करावे. तालुका ठिकाणी सुसज्ज कोविड-19 सेवा केंद्र सुरू करावे. शेतकर्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला बाजारपेठ नसल्याने भाजीपाला शेतातच सडत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. कष्टकरी, श्रमिकांना मदतनिधी द्यावे. उद्योजक, व्यावसायिकांचे सर्व कर रद्द करावेत. शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. रिक्षा, टॅक्सी चालकांना 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. खाजगी शाळांकडून होणारी सक्तीची फी वसूली बंद करावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. सदर निवेदन स्विकारून वरिष्ठांना पोहचवू अशी ग्वाही तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.
यावेळी तिसर्या आघाडीचे अध्यक्ष राजू पोवार, कॉ. सी. ए. खराडे, आय. एन. बेग, सुधाकर माने, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, गजानन खापे, सुनील गाडीवड्डर, अनिल ढेकळे, सदानंद नागराळे, फारूख नगारजी, प्रविण झळके, रमेश वागळे यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
