डॉ. संदीप पाटील: ‘गोमटेश’ मध्ये गुरुपौर्णिमा साजरी
निपाणी (वार्ता) : अनाधी काळापासून गुरूंना समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुमुळेच विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करता येते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती लोप पावत असून पाश्चातीकरणाचे अंधानुकरण चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनात नेहमी आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करावा, असे मत कोल्हापूर येथील डॉ. संदीप पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उदय उर्फ प्रशांत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून करवीर रोटरीचे दिलीप प्रधाने हे उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, समाज आणि मित्र मैत्रिणी कडून चांगले गुण अवगत केले पाहिजे. याशिवाय आई-वडिल आणि मुलांमधील संवाद हरवत चालला असून त्यांचे संस्कारही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करताना त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान महत्त्वाचे असून पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
उदय पाटील यांनी, जीवनात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूचा महिमा अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे. घरात आई – वडील आणि शाळेत शिक्षक गुरूच्या भूमिकेत असतात. त्यांचा आदर्श घेत यशस्वी व्हा. गुरूने दिलेला ज्ञानरूपी वसा आयुष्यभर जपण्याचे आवाहन केले. करवीर रोटरीचे दिलीप प्रधाने यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी पालकांची पाद्यपूजा केली. प्राचार्या ज्योती हारदी यांनी स्वागत केले. यावेळी करवीर रोटरीचे स्वप्निल कामत, विनय हसाबणीस, प्राचार्या दिपाली जोशी, जयपाल कुडचे, सुभाष इंगळे, प्राची शहा, शोभा इंगळे, नंदिनी पाटील, स्वाती चव्हाण, बबीता देसाई, भाग्यरेखा खटावकर, वर्षा केनवडे, मनीषा ऐवाळे, अमित चव्हाण, अश्विनी यालकी, अमित चव्हाण,संमती पाटील,भारती चौगुले, महानंदा बक्कन्नावर, सुहास जोके, स्नेहा जोके, नितीन रांगोळे, श्रुती रांगोळेयांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. वैशाली देशमाने यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta