प.पू. महेशानंद महास्वामीजी यांचे विचार; हंचिनाळमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
कोगनोळी : मस्तकाला तृप्त करणारा प्रसाद आणि मन तृप्त करणारा प्रसाद गुरुंच्याकडून मिळतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते असे विचार प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
हंचिनाळ के.एस (ता. निपाणी) येथील प.पू. ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते.
प.पू. महेशानंद महास्वामीजी पुढे म्हणाले, मानवी जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु पद श्रेष्ठ पद आहे. गुरु परंपरा महान आहे. जगातील सर्वात मोठे पद म्हणजे सदगुरु होय. सदगुरुंच्या सानिध्यामुळे अहंकार दूर होतो. प्रत्येकाने स्व-स्वरुपाची ओळख करुन घेणे आवश्यक आहे. परमात्मा तुमचं स्वरुप आहे. शरीर हे फक्त बॉक्स आहे. त्यामध्ये आत्मतत्त्व आत आहे. नाव नाही, रुप नाही, रंग नाही शिव ते स्वरुप आहे. देहात मी कोण आहे, जगात का आलो? हे जाणून घेण्यासाठी सदगुरु पाहिजेत. देव कोठे आहे? देव आपल्यातच आहे. अंतरमन आहे ते मनातच भगवंत आहे.
काम, क्रोध, अहंकार हा केरकचरा काढून टाकला पाहिजे. सदगुरुंनी दिलेलं स्मरण करा, ते जीवाचा उद्धार करतात. नस्वरी जीवाला सजवू नका. चंचल मनाला स्थिर ठेवा. भारत देशात परंपरेने अध्यात्मात गुरुला मोठे स्थान आहे. संस्कारामुळे घर मंदिर बनते. संतांच्या दर्शनाने परिवर्तन होते. प्रत्येकाने ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीमार्गाची कास धरावी व संत आणि सदगुरुंच्या सानिध्यात राहावे असेही शेवटी प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी सांगितले.
तत्पूर्वी सायंकाळी ४ ते ५ जपयोग, ५ ते ६ गुरुपूजा, ६ ते ७ विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा आश्रम कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.
प्रवचन झाल्यावर सागर चौगुले दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर आश्रम परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत आश्रम परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम कमिटीचे अध्यक्ष अनिल मंगसुळे, ग्रामपंचायत सदस्य एम.वाय. हवालदार, कलगोंडा पाटील, सुधाकर चौगुले, बाबुराव मंगावते, किसन खोत, संदीप जोमा, बाबासो पाटील, दिगंबर राऊत, डॉ. सुभाष दिवटे, अशोक चौगुले यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले.