उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर: ’हेल्मेट’ लघुपटाचे प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : हेल्मेट वापरासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी जागृती केली जाते. तरीदेखील वाहनधारक, नागरिक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी डोक्याला इजा झाल्यास अनेकांचा मृत्यू होतो. घरी कोणी तरी वाट पाहत असते. याची जाणीव ठेवून वाहनधारकांनी हेल्मेट वापराबाबत जागृत रहावे, असे आवाहन निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी केले. येथील लोकांनी एकत्र येऊन हेल्मेट लघुपटाची निर्मिती केली होती. त्याच्या प्रदर्शन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
गुर्लहोसूर म्हणाल्या, हेल्मेट अभावी होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृती हाच मुख्य उपाय आहे. अजित माने व त्यांच्या सहकार्यांनी लघुपटाच्या माध्यमातून केलेला जागृतीचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक अजित माने यांनी माहिती लघुपटाची सविस्तर सांगितली.
अॅड. सुष्मा बेंद्रे यांनी, दिग्दर्शक अजित माने व निपणीमधील सर्व बाल कलाकार यांचे कौतुक केले. असेच सामाजिक जीवनावरील लघुपट त्यांनी तयार करावेत. अडचणीच्या वेळी112 हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास त्वरित मदत मिळू शकते.
कार्यक्रमास अभिनेत्री केतकी गावडे, लिंगेश्वर देवकाते, डॉ. राजेश बनवन्ना, रविंद्र बोरगावकर, विजय शिंदे, संदीप पाटील, उल्हास कुरणे यांच्यासह अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे पदाधिकारी उपस्थित होते.