५०८ वर्षाची परंपरा कायम : उद्याज मोहरमचा मुख्य दिवस
निपाणी (विनायक पाटील) : बोरगाववाडी हे निपाणी
तालुक्यातील धार्मिक-संस्कृती जोपासणारे छोटे गांव आहे. हे गांव लिंगायत समाजाचे असून गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही. तरीही लिंगायत लोक मोहरम साजरा करतात. या सणाला ५०८ वर्षाची परंपरा असून सोमवारी (ता.८) मुख्य दिवस आहे.
बोरगांववाडीचा मोहरम बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मानला जातो. मोहरम सणास खाईत कुदळ मारून प्रारंभ झाला. तेथून पाचव्या दिवशी सकाळी मानकरीसह ग्राम अभिषेक होऊन देवाच्या सवाऱ्या रंगीबेरंगी पोशाखाने सजविल्या गेल्या. त्या रात्री ८ वाजता हे सवारी देव लेजिम निनादात वाजतगाजत गावचावडीमधून मिरवणुकीने भोसले (माने) गादीला प्रथम दर्शनासाठी गेले. तेथून पुन्हा देव गाव चावडी मंदिरात विराजमान झाले. देव बसल्यानंतर पहिल्या दिवशी नालपिर करबल व विश्वनाथ करबल मेलच्या दंगली व रिवायती गायल्या.
खोत घराण्याचे मानकरी रावसाहेब खोत यांच्या हस्ते कुदळ मारून मोहरम सणास प्रारंभ होऊन त्यांच्या हस्तेच देव देणे-घेणे सह अन्य कारभार पहिला. देवझाडाचा मानात विजय माने, दयानंद खोत, नरसु खोत, शिवगोंडा करडे, कल्लाप्पा गुळगुळे, बाळासाहेब खोत यांचा समावेश आहे. पांडुरंग टाकमारे, चंद्रकांत शिरोळे, पुंडलिक खोत, अनिल सकान, रमेश टाकमारे, भूपाल टाकमारे, महादेव टाकमारे, रावसाहेबदेवाळे, जोतिराम खोत, राजू कळंत्रे यांच्याकडे देव सजवण्याचा मान आहे.
ताबूत धरण्यास दिपक कळंत्रे, मलगोंडा पाटील, कल्लाप्पा खोत, श्रीरंग गुळगुळे यांचा मान आहे तर मुस्लिम फात्या बोलण्यास ईलाई पेंटर (बोरगावकर) यांचा मानात्मक समावेश आहे. शनिवारी (ता.६) सातवीच्या कंदुरीचा मान भैराटे घराण्याचा होता. या दिवसापासून भक्त देवाला दंडवत व नैवद्य नारळ चढविण्यास प्रारंभ झाला. सोमवारी (ता.८) खत्तल रात्र मोहरमचा मुख्य दिवस आहे. या दिवशी भक्त दंडवत व रोजा धरतात. हा सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांनी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta