डॉ. मोहन भस्मे यांना निरोप : बंगळूरु येथे बढती
निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार डॉ. मोहन भस्मे हे दीड वर्षापासून येथील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, कोरोना महापूर शहर विविध समस्यांना तोंड देत सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यांना बंगळुरु येथे बढती मिळाली आहे. त्यानिमित्त त्यांचा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी वर्ग गहिवरून गेला होता. मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
प्रारंभी अभिजीत बोंगाळे यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रशासनासह विविध सामाजिक संघटना व नागरिकातर्फे डॉ. भस्मे यांचा सत्कार झाला. सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे आणि एम. ए. मुल्ला यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला.
मंडलपोलीस निरीक्षक शिवयोगी म्हणाले, महापूर आणि कोरोना काळात प्रशासकीय सेवेमध्ये खंड न पडता रात्रंदिवस तहसीलदार डॉ. भस्मे यांनी कोगनोळी टोलनाकासह बोरगाव भागात खडा पहारा दिला होता. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा उद्रेक झाला नाही. पूर परिस्थिती काळात महसूल यंत्रणाद्वारे चांगल्या पद्धतीने कामकाज हाताळले आहे. याशिवाय शासकीय योजना सर्वसामान्यांना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी महसूल निरीक्षक अजित वांजोळे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत आतून डॉ. भस्मे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. भस्मे यांनी आपल्या कार्यकाळात कोरोना, महापूर, निवडणुका, विविध जयंती, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, धार्मिक कार्यक्रमातील सहभाग, रेशन पुरवठ्याची पाहणी, मतदान जनजागृती, क्रीडा क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी योजना यासह विविध कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. ते पाहून उपस्थित सर्वजणच गहिवरले होते.
कार्यक्रमास अजित देवरुशी, अनिल पोतदार, एस. एस. बेळकुडे, मोबीन सनदी, के. वाय. निडोनी, अजित वांजोळे, अभिषेक गायकवाड, शिरीष पोवार, कल्लाप्पा पुजारी, रमेश हंजी, एल. बी. पुजारी,संतोष गस्ती यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta