16 हजार ध्वजांचे उत्पादन : साळुंखे गारमेंटच्या उपक्रम
निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. घरोघरी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या ध्वजाच्या निर्मितीमध्ये निपाणीकरांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पुरविल्या जाणार्या ध्वजांचे उत्पादन निपाणी येथील प्रगती नगरामधील साळुंखे गारमेंटमध्ये सुरू आहे. त्यामुळे निपाणीकरांचा ऊर अभिमानाने भरून येणार आहे. गारमेंटकडून एका झेंड्याला केवळ 25 पैसे मजुरी घेऊन हे झेंडे पुरविले जात आहेत.
सलग दोन वर्षे कोरोना काळात साळुंखे गारमेंटमधून अत्यंत अल्प किमतीत मास्क बनवून वितरित केले होते. तीच धडाडी तिरंग्याच्या उत्पादनातही दिसत आहे.
हर घर तिरंगा मोहिमेसाठी निपाणी व परिसरात हजारो ध्वजांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने उत्पादकांना आवाहन केल्यानंतर पंधरवड्यापासून उत्पादन सुरू झाले. या गारमेंटमध्ये विनोद साळुंखे आणि वर्षा साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर साठ महिला कपडे उत्पादन करीत आहेत. कोणताही मोबादला न घेता सायंकाळी तासभर या सर्व महिला तिरंगा निर्मिती करीत आहेत. आतापर्यंत 16 हजारतिरंग्याची निर्मिती केली आहे. तर एकूण 25 हजार तिरंगा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिरंग्यावर अशोकचक्र उमटविताना किचितही इकडे-तिकडे होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. ध्वजाचा पुरेपूर सन्मान राखण्याच्या सूचना महिला कर्मचार्यांना दिल्या आहेत.
—-
’तयार कपड्यांचे उत्पादन हा आमचा 7 वर्षाचा व्यवसाय आहे. पण तिरंग्याचे उत्पादन आमच्यासाठी देशाभिमानाचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने देशसेवेची संधी मिळाली, असे आम्ही मानतो. ध्वजसंहितेचे पालन करीत गारमेंट चे दैनंदिन काम संपल्यानंतर दररोज सायंकाळी तासभर उत्पादन सुरु आहे.’
– वर्षा साळुंखे, गारमेंट प्रमुख, निपाणी
—
’स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनातर्फे ’हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे या महोत्सवातील खारीचा वाटा म्हणून दररोजच्या कामातील एक तास तिरंगा बनविण्यासाठी आम्ही मोफत काम करत आहोत.’

– राजश्री लोहार, महिला कर्मचारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta