
सुनील पाटील : 11 फुट नारळाची गणेश मूर्ती
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील श्रीगणेश मंडळातर्फे गेल्या वर्षापासून 50 गणेश उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारळाची 11 फुटी गणेश मूर्तीसह विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
बुधवारी (ता.10) सकाळी मंडळाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले होते.
प्रारंभी मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते बाबासाहेब साजन्नावर यांनी स्वागत केले.
सुनील पाटील म्हणाले, दिवंगत अशोक दुमाले यांच्या पुढाकाराने या गणेश मंडळाची स्थापना करून गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. 1996 साली गणेश मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरामधील विविध जाती धर्माच्या 100 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गतवर्षी गणेशोत्सवाला 50 वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार होते. पण कोरोना निर्बंधामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा विविध सामाजिक उपक्रमासह भव्य दिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होणार आहे. दिवंगत सोमशेखरअण्णा कोठीवाले, दिवंगत अशोकअण्णा बागेवाडी यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती-धर्माच्या युवकांना एकत्रित घेऊन 50 वर्षापासून मंडळातर्फे महाशिवरात्री, दीपोत्सव, पालखी सोहळा, रक्तदान शिबिर, जपनाम, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, युवकांसाठी जिम असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तीन वर्षापासून कापशी -पंढरपूर पायी जाणार्या वारकर्यांची भोजन व्यवस्था केली जात आहे. तर नाशिक त्रंबकेश्वर येथून येणार्या साधूंच्या झुंडीची ही व्यवस्था मंडळातर्फे केली जात आहे.
यावर्षी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अकरा फूट नारळापासून गणेश मूर्ती बनवली जाणार आहे त्याचे काम कोल्हापूर येथील मूर्तिकार सुखदेव कुंभार हे करत आहेत. त्यासाठी लागणारे नारळ मल्लिकार्जुन गडकरी यांनी दिले आहेत. बुधवारी (ता.31) पंढरपूर येथील जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या 120 टाळकरी व पखवाज वादकांच्या गजरात श्रीचे आगमन होणार आहे. यावेळी नुडसोशी येथील पंचम शिवलिंगेश्वर स्वामींच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. दररोज रात्री आठ वाजता विविध समाजातील दहा भाविकांना आरतीचा मान दिला जाणार आहे. मंगळवारी (ता.6) सायंकाळी 5 वाजता हळदी- कुंकू व रात्री 8 वाजता महाआरती होणार आहे. बुधवारी (ता.7) सकाळी गणेश याग सायंकाळी महाप्रसाद वाटप होणार आहे. शुक्रवारी (ता.9) हत्ती, घोडे, करडी ढोल, केसरी ढोल ताशा पथक आणि इचलकरंजी येथील डीजे लाईट सिस्टीम आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचेही सुनील पाटील यांनी सांगितले.
बैठकीस अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, संजय मोळवाडे, रवींद्र चंद्रकुडे, दयानंद कोठीवाले, रवींद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, बाळासाहेब जाधव, रावसाहेब पाटील, गणेश खडेद, बाबासाहेब चंद्रकुडे, रवींद्र चंद्रकुडे, प्रमोद पणदे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta