चाऊस भगिनींचा उपक्रम : कुटुंबातच पर्यावरणाचा वसा
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी विविध उपक्रमांनी रक्षाबंधन सोहळा साजरा झाला त्यानिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिला व युतीने आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. पण निपाणी येथील चाऊस कुटुंबियातील फिदा आणि सबा चाऊस भगिनींनी रोपांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. संपूर्ण चाऊस कुटुंबीय पर्यावरणाला वाहून घेतल्याने या घराण्याला पर्यावरणाचा वसा लाभला आहे.
येथील सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे प्रमुख फिरोज चाऊस हे बर्याच वर्षापासून पर्यावरण प्रेमी नागरिक म्हणून निपाणी परिसरात परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत शहर आणि परिसरात विविध ठिकाणी हजारो रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे घराण्यातच पर्यावरणाविषयी प्रेम असलेल्या दोघी बहिणींनी रक्षाबंधन सणाची अवचित साधून आपल्या घराच्या परिसरात असलेल्या रोपांना राखी बांधून मानवाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
दोघी बहिणी या शिक्षण घेत असून वडील आणि काकांच्या पर्यावरण कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांच्या कल्पकतेतून प्रत्येकाने रोप अथवा झाडाला राखी बांधून झाडांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta