निपाणीतील युवकांवर काळाचा घाला : राष्ट्रीय महामार्गावर अपघात
निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ लकडी पुलाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्रथमोउपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.
मंगळवारी (ता. 5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हर्षवर्धन गजेंद्र पोळ (वय 22, रा. जत्राट वेस, निपाणी) असे जागीच ठार झालेल्या तर आयान पठाण (वय 19 रा. दर्गा गल्ली, निपाणी) असे उपचारासाठी नेत असताना वाटेतच निधन झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात एक जण जखमी आहे.
हर्षवर्धन पोळ आणि आयान पठाण हे हिरो होंडा शाईन दुचाकीवरून (केए 23 ईबी 5813) निपाणी येथून तवंदी घाटाकडे निघाले होते. त्याचवेळी या रस्त्यावरून दुसरा दुचाकीस्वार हिरो पॅशन दुचाकीवरून (एमएच 09 एफएस 1019) जात होता. त्यावेळी महामार्गावरील लकडी पुलाजवळ आल्यानंतर दोन्ही दुचाकींची जोरात धडक झाली. या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवताना वाटेतच ठार झाला. अपघात घडताच महामार्गावरील वाहनधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटना समजताच घटनास्थळी निपाणी पोलिस स्थानकाचे पोलिस दाखल झाले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गंभीर जखमीला हलविण्यात आले. हा जखमी कोल्हापूर येथील असल्याचे समजते.
सायंकाळी उशिरा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. निपाणी शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. हर्षवर्धन पोळ हा निपाणी नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांचा मुलगा होता.