पाण्यामुळे तंबाखू कोमेजला : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
निपाणी (वार्ता) : गेल्या चार दिवसापासून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. आठ महिन्याचे ऊस पिक संपूर्णपणे शेतात आडवा झाला आहे. तर तंबाखू पिकाला पाणी लागून तंबाखू पिकांनेही माना खाली टाकल्या आहेत. त्यामुळे या पावसाचा मोठा फटका शेतकरी वर्गाला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
निपाणीत चार दिवसात ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून निपाणी परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वेदगंगा आणि दूधगंगा नद्यासह ओढ्या-नाल्याना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या ओढया-नाल्यांच्या परिसरातील शेतीतही पाणी घुसलेआहे. परिसरात तंबाखू पिकाचे क्षेत्र मोठे असून ओढ्या काठावरील शेतीतील नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला होता. त्याचे प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे यादी तात्काळ पाठवण्याची मागणी होत आहे. जुलै महिन्यानंतर पावसाने पुन्हा शेतकरी वर्गाला दणका दिला आहे. त्यामुळे यावर्षीच्या दोन्ही शेती हंगामाना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. पाऊसाबरोबर वारेही मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात उभा असलेला सर्वच ऊस जमीनी वर आडवा झाला आहे. एकाही शेतात उभा ऊस दिसत नाही, अशी परिस्थिती पावसाने झाली आहे. तशीच परिस्थिती तंबाखू पिकाची झाली आहे. जूलैच्या सुरुवातीला लावण केलेल्या तंबाखूची झाडे पाणी लागल्याने खराब होवू लागली आहेत. तर पाणी लागल्याने तंबाखूचे झाडांनी माना खाली घातलेले दिसत आहे. सध्या तंबाखू शेतात राहिलेले पाणी बाहेर काढून घेण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शेतातील पिकांना या पावसानेमोठा फटका बसला असून बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच या पावसामुळे अनेक घरे पडण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे या पावसाने मोठे नुकसान केले असून शेतकरी वर्गाबरोबर रोजंदारी कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे.
—-
‘खरीप हंगामाच्या काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने ऊस आणि तंबाखू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.’
-निरंजन पाटील, सरकार. ममदापूर