कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या : संकेश्वर पोलिसाकडून अटक व सुटका
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू झाले आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ऊस दराचा तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गुरुवारपर्यंत (ता२०) तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेळगाव येथील विधानसभेसमोर रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला होता. त्यानुसार निपाणी येथील शासकीय विश्रामधामात शुक्रवारी (ता.२१) सकाळी चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ते आंदोलनासाठी जात असताना संकेश्वर पोलिसांनी हतरगी टोलनाक्यावर आडवून त्यांना अटक केली. त्यामुळे भर रस्त्यावर बसूनच कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर दुपारी आंदोलकांना सोडून देण्यात आले.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे निपक्षपातीपणे झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाई पासून दूरच आहेत. यावर्षीही परतीच्या पावसामुळे सोयाबीन ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. साखर मंत्र्यांच्या बैठकीत ऊसाला साखर कारखाने आणि शासनाने मिळून प्रति टन ५ हजार ५०० देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारपर्यंत (ता२०) सुवर्ण मध्य काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच गुरुवारपर्यंत (ता.२०) शासनाच्या आदेशाची वाट पाहून शुक्रवारी (ता.२१) पासून बेळगाव येथील विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार जाणार होते. पण आता पोलिसांनी अडवले तरीही या पुढील काळात प्रत्येक गावात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे राजू पोवार यांनी स्पष्ट केले.
विधानसभेसमोरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्राम धामावर बैठक घेऊन याबाबतची निपाणी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने रवाना झाल्यावर हत्तरगी टोलनाक्यावर अडवण्यात आले. यावेळी पोलीस आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यात चांगलीच झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
या आंदोलनात रमेश पाटील, बाबासो पाटील, नानासाहेब पाटील, शरद भोसले, नामदेव साळुंखे, एकनाथ सादळकर, सदाशिव शेटके, शांतापा पाटील, संजय नाईक, चंद्रकांत सुतार, शिवाजी वाडेकर, शिवाजी निकम, बाबासो सूर्यवंशी, अंतू पाचापुरे, सुभाष खोत, प्रा. हालापा ढवणे, सत्यपाल मल्लापुरे, आनंत पाचापुरे, प्रकाश चव्हाण, उत्तम माडेकर, पांडुरंग तोडकर, एकनाथ यादव, श्रीपाती तोडकर, संजय जोमा, अनिकेत खोत, संजय पोवार, बबन जामदार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta