कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याच दिवशी काळा दिन म्हणून साजरा करतात. यासाठी विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. या शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेश बंदी करून त्यांना परत पाठवण्यासाठी दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदी जवळ पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहनांच्या वर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत.
या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, तीन डीवायएसपी, पाच सीपीआय, दहा पीएसआय, शंभर पोलीस कॉन्स्टेबल, 50 होमगार्ड असे तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. बी. नंदगावी यांनी सांगितले. यावेळी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, बसवराज एल्गार, सीपीआय एस. व्ही. शिवयोगी, बी. एस. तळवार, उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta