प्राथमिक अंदाजानुसार ७ कोटींचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग
निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी -जत्राट रोडवर असलेल्या श्रीपेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी (ता.2) रात्री उशिरा शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रमेश चव्हाण बंधूंचा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 7 कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दोन महिन्यात ही औद्योगिक वसाहत येथील आगीची दुसरी घटना आहे.
लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहतमधील सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे वसाहत परिसरात नागरिकांची वर्दळ नाही. या वसाहतीमध्ये असलेला रमेश चव्हाण बंधू यांचा गारमेंट कारखाना बंद होता. बुधवारी मध्यरात्री अचानकपणे कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग धुमसत जाऊन पहाटेच्या सुमारास संपूर्ण कारखाना या आगीत जळून खाक झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास नागरिकांच्यालक्षात आली. यावेळी परिसरातील काही कारखानदार व रहिवाशांनी याची माहिती कारखान्याचे मालक रमेश चव्हाण (कोल्हापूर ) यांना दिली. चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी निपाणी येथील अग्निशमन विभागाने आग शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुरुवारी (ता.3) सकाळपर्यंत ही आग धुमसत होती. याबाबत अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेत कारखान्यातील सुमारे ५ कोटींची यंत्रसामग्री, तयार कापड व इतर साहित्य संपूर्ण जळून खाक झाले आहे. त्यामुळे सुमारे 7 कोटींची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.7) सकाळी ९ पर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन विभागाच्यावतीने सुरू होते. औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती घटना समजताच परिसरातील कारखानदार उद्योजकांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta