एक पोलीस जखमी; मारहाण करणारे तरुण पसार
बेळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर सोमवारी रात्री काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना दरबार गल्ली येथील अतिसंवेदनशील चौकात घडली. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला करून पसार झालेल्या पाच हल्लेखोरांचा शोध मार्केट पोलीस घेत आहेत.
सध्या बेळगावसह संपूर्ण कर्नाटक कोरोनाच्या संकटात होरपळत आहे. दिवसेंदिवस शहरातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलीस रात्रंदिवस ड्यूटी बजावत आहेत.
या परिस्थितीत सोमवारी रात्री संवेदनशील भागात चौका चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना पाच टवाळखोरांनी पोलिसांच्याच हातातील काठी हिसकावून पोलिसांवरच हल्ला केला. गाडी का थांबवली अशी हुज्जत घालत त्या गुंड तरूणांनी आपल्या ईतर सहकाऱ्यांना बोलवून पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाला आहे. हल्ला केल्यानंतर हे गुंड दुचाकीवरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली असून मार्केटचे पोलिस अधिक्षक सदाशिवराव कटीमनी टवाळखोरांचा शोध घेत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्था निश्चित करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करणे हे धाडस कुठून येते..? पोलिसांवरील हल्ला हा निंदनीय आहे. संवेदनशील भागात खाकी कायद्याचा धाक आहे की नाही, हा प्रश्न पडतोय, अश्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी मांडले आहेत.