बेळगाव : अत्यंत गुंतागुंतीचे खून, हत्याकांड, चोरी, दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. गुन्हेगारांना गजाआड करण्यात त्याने पोलिसांना मोठी मदत केली. खऱ्या अर्थाने राज्याची शान आणि पोलिसांचा मानबिंदू असलेल्या रॅम्बोने शनिवारी जगाचा निरोप घेतला. त्याला निरोप देताना कर्तव्यकठोर पोलिसांचेही डोळे पाणावले.
बेळगाव पोलिसांच्या श्वानदलात गेल्या १२ वर्षांपासून इमानेइतबारे गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या ‘रॅम्बो’ नामक हा श्वान संपूर्ण राज्यातच वरिष्ठ पोलिसी श्वान. अनेक कठीणातील कठीण गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावण्यात त्याने अहम भूमिका निभावली. तपास अधिकाऱ्यांचा तो अतिशय लाडका कुत्रा. पोलीस आणि पर्यायाने समाजाच्या या मित्राने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रॅम्बोवर तमाम सरकारी इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
रॅम्बोच्या आठवणी सांगताना डीसीपी आमटेही गहिवरले. बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच ऑक्टोबरमध्ये रॅम्बोचा आम्ही बर्थ डे साजरा केला होता. संपूर्ण राज्यातच तो वरिष्ठ पोलीस श्वान होता. २००९ मध्ये जन्मलेल्या रॅम्बोने २०१०-११मध्ये बंगळुरात गुन्हे विभागात प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बेळगाव पोलिसांच्या श्वानदलात सामील होऊन १२ वर्षे इमानेइतबारे कर्तव्य पार पाडले. खून, दरोडे अशा अनेक महत्वाच्या गंभीर गुन्ह्यांत त्याने आरोपींचा छडा लावण्यासाठी धागेदोरे उघडकीस आणले. आज तो आमच्यात नाही याचे अत्यंत दुःख होत आहे.