बेंगळुरू : २–३ वर्षे मुले शिक्षणापासून दूर राहिली तर मुलांच्या भवितव्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या भवितव्याचा दृष्टीने येत्या जुलैअखेर राज्यात शाळा–कॉलेज सुरु करा, अशी शिफारस डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीने सरकारला केली आहे.
राज्यात कोरोना रोखण्यासह शैक्षणिक उपक्रमही सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळे शाळा-कॉलेज सुरु करणे संयुक्तिक ठरेल असेही समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्यात टप्प्या-टप्प्याने शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. पहिल्या टप्प्यात कॉलेज, दुसऱ्या टप्प्यात हायस्कूल आणि तिसऱ्या टप्प्यात तिसरी ते सातवी प्राथमिक शाळा भरविल्या जाऊ शकतात. दररोज शाळा-कॉलेज भरविणे शक्य नसल्यास एक दिवसाआड किंवा आळीपाळीने भरवता येतील आदी शिफारशी डॉ. देवी शेट्टी यांच्या तज्ज्ञ समितीने सरकारला केल्या आहेत.