
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात महिलांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. स्वयंसिध्दा उत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे, खाद्यपदार्थांचे पन्नास स्टाॅल आकर्षकरित्या थाटण्यात आले होते. महिलांनी तयार केलेला चाट मसाला शेंगदाणे लाडू, विविध प्रकारचे पापड, शेवाया, लोणचे कपडे, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने महिलांच्या पसंतीला उतरलेले दिसले. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर महिला मुली रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळाले. उत्सवाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी म्हणाल्या, स्वयंसिद्धा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्त्रियांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी केक तयार करणे, मेहंदी आणि केशरचना स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. स्पर्धेला देखील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्त्रियांना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याने मुली आणि महिलांना संगीत नृत्य कलाविष्कार सादर करता आले. महिलांनी तयार केलेले रुचकर खाद्यपदार्थ, कपडे ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधनांचे पन्नास स्टाॅल महिलांचे खास आकर्षण ठरले. दुपारी १ वाजता स्टाॅलचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. त्यामुळे महिलांना आपल्या स्टाॅलवर चांगला व्यापार करता आला. मुख्य समारंभाला प्रमुख पाहुण्या श्रीमती शीला उमेश कत्तीं यांची उपस्थिती महिलांना प्रेरणा देणारी ठरली..बेळगांवच्या प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग, डॉ. राधिका कुलकर्णी यांचे मौलिक विचार महिलांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन घडविणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta